बेंगळुरू – कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जून रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची शिफारस भाजपच्या प्रदेश समितीने केली होती परंतु भाजप श्रेष्ठींनी त्यांची ही शिफारस नाकारली असून येडियुरप्पांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आले आहे.
भाजपने मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पक्षाच्या राज्य सचिव हेमलता नायक, एस केशवप्रसाद आणि चलवादी नारायणस्वामी यांची उमेदवारी जाहीर केली.राज्य भाजपच्या कोअर कमिटीने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व येडियुरप्पांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांच्या नावाची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली होती पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे.
त्यांना सन 2023 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाऊ शकते असे पक्ष नेत्यांचे म्हणणे आहे. तथापि येडियुरप्पा हे विधान परिषदेच्या जागेसाठी आग्रही होते. आपल्या मुलाला मंत्री करावे ही त्यांची मागणीही यापुर्वी फेटाळण्यात आली आहे.