बंगळुरू – भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकातील सगळ्यांत बडे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारली आहे. येडियुरप्पा यांच्या लोकप्रियतेमुळेच कर्नाटक या दक्षिणेकडील पहिल्या राज्यात भाजपचे सरकार आले होते. त्यांच्याच मुलाला उमेदवार न दिल्यामुळे ते नाराज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र येडियुरप्पा यांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया देत या विषयाला हवा देण्याचे टाळले आहे. त्यामुळे त्यांची ही शांतता कदाचित भाजपला पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धक्का देणारी ठरू शकते.
विजयेंद्र यांना उमेदवारी दिली गेली नाही याला फार महत्व देण्याची गरज नाही. भविष्यात कदाचित त्यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात ते मोठे काम करतील असे येडियुरप्पा म्हणाले. आपले राजकीय विरोधक आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. ए. संतोष यांच्यामुळे विजयेंद्र यांचा पत्ता कट झाल्याचा त्यांनी इन्कार केला. अशा चर्चांना काही अर्थ नसतो असे ते म्हणाले.
दरम्यान, विजयेंद्र यांनीही याला महत्व देण्याचे टाळले. पद आणि सत्ता हेच महत्वाचे नसते आणि तेच उद्दिष्टही नसते असे त्यांनी म्हटले आहे.
मात्र राज्यातील निर्विवादपणे सगळ्यांत मोठ्या नेत्याला उमेदवारी नाकारून भाजपने धोका पत्करला आहे. 75 वर्षांच्या पुढील नेत्याची मार्गदर्शक मंडळात रवानगी करण्याचे धोरण मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने स्विकारले होते. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा दिग्गजांनाही निरोप देण्यात आला होता. मात्र येडियुरप्पा त्याला अपवाद ठरले होते.
त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती, तीही पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर. असे असताना आता त्यांच्या मुलाला आमदारकी नाकारून पक्षाने संदेश दिला आहे का, असा प्रश्न समोर येतो. तसेच भविष्यात विजयेंद मोठी जबाबदारी सांभाळतील या येडियुरप्पा यांच्या प्रतिक्रियेतूनही वेगळा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. 2023 मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हाच या सगळ्याचा उलगडा होईल.