भाजपला मिळाल्या 785 कोटी रूपयांच्या देणग्या; कॉंग्रेसपेक्षा पाच पट अधिक रक्कम

नवी दिल्ली- केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला 2019-20 या वर्षात 785 कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या. त्या कालावधीत कॉंग्रेसला देणग्यांपोटी 139 कोटी रूपये मिळाले. म्हणजेच, भाजपला मिळालेल्या देणग्यांची रक्कम कॉंग्रेसपेक्षा पाच पट अधिक आहे.

राजकीय पक्षांना व्यक्तिगत स्वरूपात, कंपन्यांकडून आणि इलेक्‍टोरल ट्रस्टच्या माध्यमातून देणग्या उपलब्ध होतात. त्याचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. करोना संकट विचारात घेऊन आयोगाने संबंधित वार्षिक तपशील सादर करण्यासाठी राजकीय पक्षांना 30 जूनपर्यंत मुदत वाढवून दिली. त्यानुसार, राजकीय पक्षांनी वार्षिक अहवाल सादर केले.

भाजपने सलग सातव्या वर्षी सर्वांधिक देणग्या मिळवण्याचा मान मिळवला. भाजपच्या पक्षनिधीसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांमध्ये पियूष गोयल, पेमा खांडू, किरण खेर आणि रमण सिंह आदींचा समावेश आहे. त्या पक्षाला देणगी देणाऱ्या कंपन्यांमध्ये आयटीसी, कल्याण ज्वेलर्स, रेअर एंटरप्रायझेस, अंबुजा सिमेंट, लोढा डेव्हलपर्स आणि मोतीलाल ओसवाल ग्रुपचा समावेश आहे. त्याशिवाय, न्यू डेमोक्रॅटिक, प्रुडंट, जनकल्याण आणि ट्रायम्फ या नावांनी असणाऱ्या इलेक्‍टोरल ट्रस्टनी भाजपला देणग्या दिल्या आहेत.

भाजप आणि कॉंग्रेसखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसला 59 कोटी रूपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या. माकपला 19.7 कोटी रूपये, तृणमूल कॉंग्रेसला 8 कोटी रूपये, तर भाकपला 1.3 कोटी रूपये रकमेच्या देगण्या मिळाल्या. राजकीय पक्षांच्या अहवालांमध्ये केवळ 20 हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम असणाऱ्या देणग्याच नमूद करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.