तृणमूल म्हणजे ‘टेररिस्ट मॅन्युफॅक्‍चरींग कंपनी’; भाजपची जहरी टीका

कोलकाता – प. बंगाल विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली असताना भारतीय जनता पार्टी राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये शाब्दीक हल्लाबोल तिव्र झाला आहे. आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसची नवी व्याख्याच करून टाकली आहे.

तृणमूल कॉंग्रेस म्हणजे टेररिस्ट मॅन्युफॅक्‍चरींग कंपनी असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या पक्षाची ज्या उद्देशासाठी स्थापना झाली होती, त्या उद्देशापासून पक्ष भरकटला आहे व आता आपण जे बोललो तीच राज्यातील युवकांचीही भावना असल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला आहे.

भाजपने मध्य प्रदेशातील नेते कैलास विजयवर्गीय यांना गेल्या काही काळापासून प. बंगालमध्ये प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या नियुक्तीपासून बंगालमध्ये भाजप बऱ्यापैकी सक्रिय झाली आहे. पक्षाला लोकसभेतही चांगली कामगिरी करता आली. मात्र त्याचमुळे विजयवर्गीय आता तृणमूलच्या निशाण्यावर आले आहेत.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी विजयवर्गीय यांना लक्ष्य करताना बाहेरचा नेता असा त्यांचा उल्लेख केला होता. तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना त्यांनी चक्क गुंड संबोधले होते. दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता घोष यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. अभिषेक बॅनर्जी एक बच्चा असल्याचे घोष यांनी म्हटले आहे.

घोष म्हणाले की, बॅनर्जी यांनी त्यांना ठग आणि माफियाही म्हटले आहे. त्यांची हताशा आपण समजू शकतो. वास्तविक ठग कोण आहे, याची राज्याच्या जनतेलाही कल्पना आहे. बॅनर्जी यांच्या ताफ्यात 25 कार आहेत. त्यात काय काय असते याची सगळ्यांना कल्पना आहे. ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करताना ते म्हणाले की, हा बच्चा ममता यांच्या मांडीवर बसून राजकारणात आला आणि आज खासदार झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.