अरुणाचलमध्ये भाजपला धक्का

एकाच वेळी 8 आमदारांचा पक्षाला रामराम : एनपीपीमध्ये प्रवेश
निवडणुकीत एनपीपी कोणाशीही युती करणार नाही
विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकाच दिवशी

इटानगर -लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अरुणाचल प्रदेश येथे दोन मंत्री आणि 6 आमदारांनी पक्षाला रामराम केला आहे. भाजपतून बाहेर पडत या नेतेमंडळींनी नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) या पक्षात प्रवेश केला आहे. संपूर्ण देशात एकीकडे निवडणुकांच्या रणांगणात पक्ष मोठया ताकदीने उतरत असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, नॅशनल पीपल्स पार्टीचे राष्ट्रीय सचिव थॉमस संगमा यांनी पक्षात आलेल्या नव्या नेत्यांचे स्वागत केले. भाजपमधून एनपीपीमध्ये आलेल्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपची विचारसरणी ही योग्य नसल्याचं म्हणत आपला पक्ष हा कोणाशीच युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकांची उमेदवारी न दिल्यामुळे नाराज आमदारांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ही परिस्थिती आणि पक्षांतर करणारे नेतेमंडळी पाहता 8 आमदार आणि त्यांच्यासह एकूण 12 पदाधिकारी अशा एकूण 20 जणांनी एनपीपीफत प्रवेश केला आहे.

अरुणाचल प्रदेश येथे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच दिवशी म्हणजे 11 एप्रिलला पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपच्या संसदीय समितीने रविवारी 60 सदस्यसंख्या असणाऱ्या विधानसभेसाठी 54 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर राज्य सचिव जरपूरम गॅमलिन, राज्याचे गृहमंत्री कुमार वै, पर्यटन मंत्री जरकार गॅमलिन आणि इतर आमदारांनी उमेदवारी न दिल्याबद्दलची नाराजी व्यक्त करत एनपीपीची वाट धरली. ऐन निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर करणाऱया कुमार वै यांनी यावेळी भाजपविषयीची नाराजी उघडपणे मांडली. भाजप हा एक योग्य पक्ष असता तर, मी त्याच पक्षासाठी कार्यरत राहिलो असतो. पण, सध्याच्या घडीला इथे हुकुमशाहीचे राजकारण सुरू आहे. आमचे राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, ही महत्त्वाची बाब मांडत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)