पिंपरी (प्रतिनिधी) – एकीकडे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असतानाच पिंपरी-चिंचवड शहरात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा दिल्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकेकाळी बोराटे हे भोसरीचे आमदार आणि भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक मानले जात होते. लांडगे यांच्याच विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक दोनमधून बोराटे हे निवडून आले होते. बोराटे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नगरसेवक वसंत बोराटे हे प्रभाग क्रमांक दोन मोशी-जाधववाडी या भागातून 2017 मध्ये निवडून आले होते. गेल्या पाच वर्षांत त्यांना एकही पद दिले नसल्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी आज (बुधवार) महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
याबाबत नगरसेवक वसंत बोराटे म्हणाले मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते, परंतु ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे.
नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहराध्यक्ष पदी अजित गव्हाणे यांची नियुक्ती केली आहे. नवीन शहराध्यक्ष भोसरी परिसरातीलच आहेत. काही दिवसातच याच विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या नगरसेवकाने राजीनामा दिला आहे व त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. बोराटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यास हे गव्हाणे यांचे पहिले यश मानले जाऊ शकते.