मराठा आरक्षण विरोधामागे “नागपूर कनेक्‍शन’

भाजपने रसद पुरवली : कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

पुणे – मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या काही संघटना आणि व्यक्तींचे थेट “नागपूर कनेक्‍शन’ स्पष्ट झाले आहे.

यात काही भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणविरोधी लढाईत भाजपनेच रसद पुरवली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कॉंग्रेस भवन येथे ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर आदी उपस्थित होते.

मराठा समाजाने आरक्षणासाठी प्रदीर्घ लढा दिला आहे. 40 पेक्षा अधिक तरुणांनी हौतात्म्य पत्करले आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत सर्व पक्षांनी एकमत करून विधिमंडळात कायदा केला होता.

असे असतानाही मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या “सेव्ह मेरिट फाउंडेशन’सह काही संघटना आणि व्यक्तींचे थेट “नागपूर कनेक्‍शन’ स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षणविरोधी भूमिका ही प्रथमपासूनच स्पष्ट आहे, असा आरोपही सावंत यांनी केला.

केंद्र सरकारने पाठवलेले सर्व व्हेंटिलेटर नादुरूस्त
पीएम केअर फंडातून राज्यात आलेले सर्व व्हेंटिलेटर खराब आणि नादुरूस्त आहेत. ज्या कंपन्यांकडून ते पुरवण्यात आले आहेत त्या कंपन्या बनावट असल्याचा आरोप सावंत यांनी केला. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणीही सावंत यांनी यावेळी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.