पाटणा – कुराणांमधील काही आयाती वगळाव्यात अशी मागणी करणारी याचिका उत्तरप्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेला आमचा सक्त विरोध आहे असे भाजपचे नेते सय्यद शहानवाज हुसेन यांनी म्हटले आहे. हा धार्मिक भावनांचा अनादर असून त्याचा आम्ही निषेध करतो असेही त्यांनी म्हटले आहे. रिझवी यांनी अशा प्रकारचे कृत्य करून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.
रिझवी यांनी पवित्र कुराणातील 26 आयाती आक्षेपार्ह असून त्या त्यातून काढून टाकाव्यात अशी मागणी आपल्या याचिकेत केली आहे. धार्मिक पवित्र ग्रंथांचा अवमान करणाऱ्या अशा कोणत्याही प्रकाराला भाजपचा विरोधच आहे असेही त्यांनी म्हटले आहे. कुराण किंवा अन्य कोणत्याही धार्मिक ग्रंथांमध्ये कोणताही बदल करण्यास भाजप मान्यता देत नाही असेही शहानवाझ हुसेन यांनी म्हटले आहे. रिझवी यांना लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.