सातारा – लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. त्याचा भाजप जिल्हा कार्यकारीणीच्यावतीने शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनातील निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष अभय फडतरे, युवा मोर्चाचे गणेश मेळवणे, विठ्ठल बलशेटवार, ऍड. प्रशांत खामकर, भाजप गटनेत्या सिध्दी पवार, प्राची शहाणे, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, विजय काटवटे, आशा पंडित आदी यावेळी उपस्थित होते.
राफेल विमान खरेदीच्यावेळी राहुल गांधी यांनी विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकीदार चोर है असे वक्तव्य केले होते. राफेल खरेदीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांना क्लीन चीट दिल्यानंतरही कॉंग्रेसने बेताल आरोप सुरूच ठेवल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी राहुल गांधी यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.