मुंबई – मराठा आरक्षणापाठोपाठच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापत आहे. या पार्श्वभूमीवर 26 जून रोजी भाजपा राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच आता रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशाराही दिला.
ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने आज मुंबईत भाजपची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे व अन्य नेते उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडेंनी सांगितलेले खरे आहे, आज आम्ही सर्व ओबीसी नेते या निकषावर आलो आहोत, की या महाराष्ट्र सरकारला ओबीसींचे आरक्षण द्यायचे नाही. म्हणून 26 जून रोजी महाराष्ट्रात एक हजार ठिकाणी भाजप आंदोलन करणार आहे.
गरज पडल्यास आम्ही सर्वजण पुन्हा न्यायालयात जाऊ आणि या सरकारला ओबीसी आरक्षण देण्यासाठी भाग पाडू. या सरकारने ओबीसी आरक्षण घालवित ओबीसींवर अन्याय केला असून आता नौटंकी करत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी 31 जुलै 2019 रोजी ओबीसींचे राजकीय आरक्षण जे महाराष्ट्रात लागू होते ते कायम ठेवण्यासाठी अध्यादेश काढला. सर्वोच्च न्यायालयाने त्या अध्यादेशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी परवानगी दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात 31 जानेवारीपर्यंत तो अध्यादेश लागू होता. मात्र 31 जानेवारी रोजी या सरकारने तो अध्यादेश रद्द केला आणि त्याचे पडसाद आहेत की, न्यायालयात आज ओबीसींचे आरक्षण टिकले नाही, असेही बावनकुळे म्हणाले.