Rajya Sabha election strategy : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता राज्यातील राजकीय समीकरणे अधिक मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या मित्रपक्षाला थेट विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने राष्ट्रीय लोकमोर्चा या पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचे समोर आले आहे. या पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने १६ मार्चला होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी कुशवाह यांना भाजप किंवा संयुक्त जनता दल यांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. दरम्यान, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही आपल्या पक्षाला राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दबाव वाढविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुशवाह यांच्यावर राजकीय ताण वाढला आहे. राजकीय चर्चेनुसार, राष्ट्रीय लोकमोर्चाचा भाजपमध्ये विलय झाल्यास कुशवाह यांचा राज्यसभेचा मार्ग सुकर होऊ शकतो. तसेच बिहारमध्ये त्यांच्या प्रभावातील समाज थेट भाजपशी जोडला जाईल. एका दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती भाजपकडून आखली गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी संयुक्त जनता दल सोडताना कुशवाह यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे विलिनीकरणाच्या प्रस्तावावर ते काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे. कुशवाह यांचे पुत्र बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत, तर पत्नी आमदार आहेत. पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची उमेदवारी धोक्यात आल्यास त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येणारी राज्यसभा निवडणूक बिहारच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.