नवी दिल्ली –भाजपने पश्चिम बंगालमधील नेते मुकूल रॉय यांना बढती दिली आहे. त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यातून भाजपने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यावर मोठा विश्वास दाखवल्याचे सूचित होत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शनिवारी पक्षाचे नवे राष्ट्रीय पदाधिकारी निश्चित केले. त्यामध्ये रॉय यांना मानाचे स्थान मिळाले आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे रॉय यांच्या बढतीला महत्व प्राप्त झाले आहे. रॉय यांची एकेकाळी ममतांचे निकटवर्तीय म्हणून ओळख होती. एवढेच नव्हे तर, ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. मात्र, ममतांशी मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये तृणमूलबरोबरचे संबंध तोडले. त्यानंतर भाजपने त्यांना बरोबर घेतले.
मागील काही दिवसांपासून रॉय स्वगृही (तृणमूल) पतरण्याची शक्यता असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता त्या चर्चांना भाजपने रॉय यांना दिलेल्या बढतीमुळे पूर्णविराम मिळणार आहे. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना भाजपची भिस्त ममतांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यावर राहणार असल्याचेही रॉय यांच्या बढतीतून सूचित होत आहे.