भाजपची विजयोत्सवाची तयारी; दहा हजार मोतीचूर लाडूंची ऑर्डर

मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर एक्‍झिटपोलने महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर भाजपाने मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच विजयोत्सवाची जोरदार तयारी केली आहे. उद्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपने नरिमन पॉंईट येथील प्रदेश कार्यालयाच्या परिसरात निवडणूक निकालांसाठी दोन मोठे टीव्ही स्क्रीन, स्टेज उभारले असून सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी तब्बल 10 हजार मोतीचूर लाडूंची ऑर्डर दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरवात होईल. टीव्ही चॅनेलवरच्या एक्‍झीट पोलमध्ये शिवसेना भाजप महायुती पुन्हा राज्यात सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवल्यामुळे भाजप नरिमन पॉंईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात जल्लोषाची तयारी सुरु झाली आहे. आजपासूनच मोतीचूर लाडू तयार करण्याचा घाट घातला आहे. दिवसभरात पाच हजार मोतीचूर लाडू तयार झाले असून निकाल जाहीर होईपर्यंत आखणीन पाच हजार मोतीचूर लाडू तयार होतील असे भाजप कार्यालयातून सांगण्यात आले. त्याशिवाय मतमोजणीची लाईव्ह माहिती मिळण्यासाठी दोन एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत.

प्रदेश कार्यालयाच्या बाहेर स्टेज, इलेक्‍ट्रॉंनिक्‍स माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाईट देण्यासाठी माईक स्टॅंड, विद्युत रोषणाई, पावसापासून बचाव करणारा मंडप अशी जय्यत तयारी आहे. निकाल येण्यास सुरवात झाल्यावर ढोल ताशांचीही तजवीज करून ठेवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.