कच्छ – केवळ कॉंग्रेसच्या अकार्यक्षमतेमुळेच भारतीय जनता पार्टी गेले 27 वर्ष गुजरात मध्ये सत्तेवर आहे. भाजपला पराभूत करण्याची कॉंग्रेसला इच्छाच दिसत नाहीत,आणि ते लोक आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करीत आहेत. आम्ही गुजरात मध्ये 182 पैकी केवळ 13 जागा लढवत आहोत.
उर्वरीत 169 जागांसाठी कॉंग्रेसला मैदान मोकळे आहे त्यांनी तेथे आपली कर्तबगारी दाखवून द्यावी असे आव्हान एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिले आहे. आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले आम्ही केवळ मते खाण्याचे काम करून भाजपला मदत करतो असा दावा कॉंग्रेसकडून सतत केला जातो.
त्यांचा हा आरोप म्हणजे त्यांच्या पक्षाची क्षमता आणि कर्तृत्व याचा अभाव झाकण्याचा प्रकार आहे. आज भारतीय जनता पक्ष गुजरात मध्ये 27 वर्ष सरकार मध्ये आहे. कॉंग्रेस केवळ विरोधी बाकांवरच राहिली आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीत भाजपला हरवण्यास कॉंग्रेसला कोणी अडवले होते असा सवालही ओवैसी यांनी केला.