शिराळा – शिराळा तालुक्यातील आरळा, शिरसटवाडी, उपवळे येथील झालेल्या ग्रामपंचायत पोट निवडणुकीत किंनरेवाडी येथील राकेश सुतार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करून भाजपने जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा तालुक्यात कमळ फुलवले आहे. कोकरूड जिल्हा परिषद गटातील ही पोट निवडणूक बिनविरोध झाल्याने तालुक्यात भाजपमध्ये आनंदी वातावरण असून कार्यकर्ते पुन्हा एकदा उत्साही झालेले दिसत आहेत. आरळा येथून रामभाऊ बडदे, उपवळे येथून सविता अशोक गुरव, व शिरसटवाडी येथून बजरंग बापू खटींग हे विजयी झाले आहेत.
शिराळा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. संजय चौगुले, सिंकदर तांबोळी, विष्णू दळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. एकूण चोवीस ग्रामपचांयतीच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी पाच ग्रामपंचायतींचा निकाल बिनविरोध झाला आहे. तर सोळा ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल न झाल्याने त्या जागा पुन्हा रिक्तच राहिल्या आहेत. किनरेवाडी येथील संरपंच निवड बिनविरोध झाली. तसेच शिंदेवाडी, मानेवाडी याठिकाणी अर्ज न आल्याने सरपंचपद रिक्त राहीले.
उपवळे येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री सविता गुरव व सिंधु गुरव तर आरळा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग रामभाऊ बडदे व शिवाजी पावसकर यांच्यात लढत होवून रामभाऊ बडदे तर सविता गुरव हे दोन उमेदवार विजयी झाले. शिरसटवाडी प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण गटात बजरंग खटींग व कमलेश खटींग यांच्यात लढत होवून बजरंग खटींग विजयी झाले. तालुक्यात एकूण 91 ग्रामपंचायती असून त्यापैकी रिक्त जागेसाठी चोवीस ठिकाणी पोट निवडणूक लागली. तर विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने लादेवाडी, खराळे, चिंचोली, नाठवडे याठिकाणी सदस्य तर किनरेवाडी येथील सरपंच निवडीसाठी एकच अर्ज असल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
लादेवाडी येथील प्रभाग एक मधून कृष्णात खामकर, खराळे प्रभाग दोन मधून वर्षा प्रकाश पाटील, चिंचोली प्रभाग एकमधून राजाराम सकटे तर नाठवडे येथून प्रभाग तीन मधून मुमताज अल्लाबकस मुजावर, आरळा येथील प्रभाग दोन मधून अब्दुलगणी डांगे हे सदस्य म्हणून तर किनरेवाडी येथे सरपंचपदी राकेश बबन सुतार बिनविरोध निवडून आले. कदमवाडी, खुदलापुर, बेलेवाडी, चिंचेवाडी, शिंदेवाडी, मराठेवाडी, धसवाडी, पाचगणी, मोरेवाडी, अस्वलवाडी, भैरेवाडी, चिखलवाडी, ढोलेवाडी, शिवरवाडी, वाकाईवाडी या ठिकाणी अर्ज न आल्याने जागा रिक्त राहिल्या आहेत.