मनमोहनसिंग यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर भाजपाचा पलटवार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोनाबाधितांच्या व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाठवलेल्या पत्रावर एक दिवसानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पलटवार केला. आपल्या सल्ल्याचे कॉंग्रेसजनांनी पालन करावे आणि करोनाविरूध्दच्या लढ्याला पाठबळ द्यावे, असा सल्ला मनमोहनसिंगांनी द्यावा असे ते म्हणाले.

सिंग यांनी देश अभूतपूर्व अशा परिस्थितीचा सामना करत असून लसींच्या डोसच्या ऑर्डरचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली. यासाठी पारदर्शक धोरण आखण्याची गरजही व्यक्त केली. या पत्राला उत्तर देताना हर्ष वर्धन यांनी लिहले आहे, करोनाविरूध्दच्या लढ्यात लसीकरणाच्या पध्दतीचे महत्व तुम्हाला खूप चांगल्या पध्दतीने समजले आहे.

मात्र, तुमच्या पक्षातील जबाबदार पदावर काम करणाऱ्या व्यक्ती अणि तुमच्या पक्षाच्या राज्य सरकारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना दुर्देवाने ते तेवढे समजल्याचे दिसत नाही. आपल्या पक्षातील लोकांना सकारात्मक सहकार्याचे आवाहन केल्यास इतिहास आपणाविषयी कृतज्ञ राहील असे त्यांनी म्हटले आहे.

आपण सुचवलेल्या काही मुद्‌द्‌यांपैकी काही मुद्‌द्‌यांवर सरकारने यापूर्वीच उपाय योजना सुरू केल्या आहेत. विश्‍वासार्ह परदेशी संस्थांनी मान्यता दिलेल्या लसींच्या आयातीला सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. आपण ही सूचना 19 एप्रिलला केली आहे पण हा निर्णय 11 फेब्रुवारीलाच घेतला आहे, असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

भारताच्या लसीकरण मोहिमेबाबत काही ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या मनात अद्याप कृतज्ञतेचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या लसीच्या परिणामकारकतेबाबत चुकीच्या माहिती पसरवण्यात कॉंग्रेसजनांनी अनुचिरत स्वारस्य दाखवले आणि नागरिकांच्या जीविताशी खेळल्याचा आरोप त्यांनी केला.

तुमच्या काही नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे कॉंग्रेस शासित काही राज्यांत ज्येष्ठ नागरिक आणि आघाडीच्या करोना योध्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी लसीकरण झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.