पिंपरी – शिवसेना नगरसेवकासोबत का राहतो या कारणावरून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनुप मोरे यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यावर मोरे यांनी शिवसेना नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. मोरे यांच्या विरोधात दोन अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिल्या घटनेत प्रसाद नारायण पांडे (वय 37, रा. पेठ क्रमांक 25, प्राधिकरण, निगडी) यांनी प्राधिकरण चौकीत फिर्याद दिली आहे. अनूप अविनाश मोरे (वय 37, रा. पेठ क्रमांक 28, प्राधिकरण, निगडी) यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. अनूप मोरे यांनी फिर्यादी पांडे यांना फोन केला. तू शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्यासोबत का राहतो, या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच उचलून नेऊन हातपाय तोडण्याची धमकी दिली, असे पांडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आपल्या विरोधात पांडे यांनी फिर्याद दिल्याचे कळताच अनूप मोरे, सिद्धार्थ मोरे (दोघेही रा. प्राधिकरण) गौरव गोळे, आशिष राऊत (दोघेही रा. आकुर्डी) हे सर्वजण शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या कार्यालयासमोर गेले. प्रसाद पांडे याला आमच्या ताब्यात द्या. त्याला आता मारून टाकतो, अशी धमकी दिली. याबाबत राहुल राजेंद्र गावडे (वय 36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी अदखलपात्र गुन्ह्याची फिर्याद दिली आहे. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आकुर्डी चौकीसमोर जमल्याने मोठा तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.
वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित गावडे यांच्या कार्यालयासमोर गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच संबंधितांना ताब्यात घेतले. याबाबत सर्वांना नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रकिया सुरू आहे. याबाबत अनूप मोरे यांनी सांगितले की, गैरसमजतीमधून हा प्रकार घडला आहे. राजकीय षडयंत्रातून मला अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र आता आमच्यातील गैरसमज दूर झाले आहेत.