भोपाळ : केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय पोटनिवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र, त्यांना भाजपच्या उमेदवारीने हुलकावणी दिली. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून खासदार बनल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
त्यामुळे ते प्रतिनिधित्व करत असलेला बुधनी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला.त्या मतदारसंघात १३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये कार्तिकेय यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. भाजपने उमेदवार म्हणून माजी खासदार रमाकांत भार्गव यांना पसंती दिली.
त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी शिवराजपुत्राला आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, उमेदवारी न मिळाल्याची कुठली खंत नसल्याचे कार्तिकेय यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने भार्गव यांना उमेदवारी मिळणे योग्यच आहे. उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने मी पक्षकार्य करत नाही. संभाव्य उमेदवार म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझे नाव पुढे केले. ते मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.