नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, याबाबत चर्चा सुरू आहे. मागील वर्षी जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या अध्यक्षाच्या नावाची अटकळ सुरू झाली होती. मात्र, अद्याप नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही, त्यामुळे नड्डा यांच्याकडेच वाढीव कालावधीत अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.
काही काळापूर्वी असेही समोर आले होते की,भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) एका नावावर सहमत होऊ शकले नाहीत. परंतु, आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
कधी मिळणार नवे अध्यक्ष?
सूत्रांनुसार, भाजपला याच महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल. महिन्याच्या अखेरीस नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप श्रेष्ठी कोणाला अध्यक्षपदाची जबाबदारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसा हवा आहे नवा अध्यक्ष?
नड्डा यांच्या कार्यकाळात भाजपला मोठे यश मिळाले. पक्षाला असाच अध्यक्ष हवा आहे, जो पक्षाला यश मिळवून देईल आणि पक्ष श्रेष्ठींचा विश्वासू असेल.