भाजपचा डिसेंबरपर्यंत नवा अध्यक्ष

पक्षाची सुपर पॉवर बनणार नसल्याची अमित शहा यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली :  भाजपला डिसेंबरपर्यंत नवा अध्यक्ष मिळणार आहे. त्याबाबतची माहिती पक्षाचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी दिली. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या अध्यक्षाला वाट मोकळी करून देणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

एका मुलाखतीवेळी शहा यांनी भाजपमधील नेतृत्वबदलाचे सूतोवाच केले.  अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या नेत्यावर सोपवल्यानंतरही शहा हेच भाजपचे सुपर पॉवर असतील. पडद्याआडून ते पक्षाचे कामकाज पाहतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, तसे घडणार नाही, अशी ग्वाही देताना शहा म्हणाले, भाजप म्हणजे काही कॉंग्रेस नव्हे. पडद्याआडून कुणी भाजप चालवू शकत नाही. भाजपचे कामकाज पक्षाच्या घटनेनुसार चालते. भाजपच्या नव्या अध्यक्षाने धुरा हाती घेतल्यानंतर त्या चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्यावरील पक्षीय कामकाजाचा भार हलका करण्यासाठी जे.पी.नड्डा यांना भाजपचे कार्याध्यक्ष करण्यात आले. तेच शहा यांची जागा घेतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात स्वत:चा मुख्यमंत्री बनवण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. त्याबाबतचा प्रश्‍न शहा यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शहा यांनी आधीच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरी जात आहे. फडणवीस हेच पुन्हा सरकारची धुरा सांभाळतील, असे त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.