हिंजवडीत मुदत संपल्यानंतरच्या प्रचारावरून भाजपा-राष्ट्रवादीत तणाव 

मतदानासाठी चोख बंदोबस्त

हिंजवडी येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील 14 केंद्रे ही पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या हद्दीत येत असून यामध्ये 56 बूथचा समावेश होता. यातील 50 बुथ हे हिंजवडी पोलीस ठाणे तर 6 बुथ हे दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. तर दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे लोकसभा मतदारसंघातील एक मतदान केंद्र येते. या ठिकाणी परिमंडळ दोनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानासाठी 500 पोलीस कर्मचारी तैनात होते. यामध्ये 2 पोलीस उपायुक्त, 2 सहायक पोलीस आयुक्त, 14 पोलीस निरीक्षक, 51 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, 369 कर्मचारी, 55 होमगार्ड यांचा समावेश होता.

पिंपरी – प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रचारापासून रोखणाऱ्या हिंजवडीच्या उपसरपंचावर एक दिवसाच्या अटकेची कारवाई करण्यात आल्याने हिंजवडीत भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी ही कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी फोन करून दबाव टाकून करावयाला भाग पाडल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

तिसऱ्या टप्प्यात आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. बारामतीसाठी रविवारी सायंकाळी प्रचार संपलेला असतानाही सोमवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांना घेवून डॉ. आकाश राठोड हे हिंजवडी परिसरात भाजपाचा प्रचार करत होते. प्रचाराची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे यांनी हा प्रचार रोखला. मात्र यातून बाचाबाची झाली. बाचाबाची होताच राठोड यांनी हिंजवडी पोलीस ठाणे गाठून साखरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निवडणूक काळामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीआरपीसी 151 (3) प्रमाणे साखरे यांना ताब्यात घेत एक दिवस अटकेत ठेवले. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे चिडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे साखरे यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भाजपाचे कार्यकर्ते आचारसंहिता भंग करून प्रचार करत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी साखरे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दबावातून केल्याचा आरोप करत सोशल मिडीयावर याबाबतची पत्रके व्हायरल केली. यामुळे हिंजवडीत तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी दिवसभर सागर साखरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यामुळे हिंजवडीत दिवसभर तणावाचे वातावरण होते. प्रतिबंधत्मक कारवाईची मुदत संपल्यानंतर साखरे यांना 15 दिवस पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.