संसदीय समितीच्या बैठकीतून भाजप खासदार पडले बाहेर

नवी दिल्ली -विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी करोना लसीकरण धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. संबंधित मुद्‌द्‌यावरील चर्चेला विरोध दर्शवत समितीचे सदस्य असणारे बहुतांश भाजप खासदार बैठकीतून बाहेर पडले.

कॉंग्रेस नेते जयराम रमेश अध्यक्ष असणाऱ्या समितीची बैठक नाट्यमय ठरली. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाविषयी प्रश्‍न विचारण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला भाजप खासदारांनी विरोध दर्शवला. बैठकीचा मुख्य अजेंडा लसनिर्मिती आहे.

त्यावरच चर्चा व्हावी. सध्या देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यामुळे लसीकरण धोरणावर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. धोरणावर कुठले आक्षेप घेतले गेल्यास लसीकरण प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, अशी भूमिका भाजप खासदारांनी घेतली.

त्या पक्षाच्या एका खासदाराने तर बैठकच लांबणीवर टाकण्याची आणि त्यावर मतदान घेण्याची मागणी केली. ती मागणी रमेश यांनी फेटाळली. तर, लोकप्रतिनिधी या नात्याने प्रश्‍न विचारण्याचा अधिकार असल्याची भूमिका विरोधी पक्षांच्या खासदारांनी घेतली. त्यामुळे बैठकीत तासभर गोंधळाची स्थिती राहिली. त्यानंतर सरकारचे वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन आणि इतरांनी बैठकीत लसनिर्मितीबाबत माहिती दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.