भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची घेतली भेट; सांगितले भेटीमागचे कारण

मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उदयनराजे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतु उदयनराजे यांनी आपली ही भेट राजकीय नसून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला.

उदयनराजे यांनी आज शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. तसंच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. तसेच यावेळी उदयनराजे भोसले यांना अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी आपल्याला या प्रकरणातील काहीही माहित नसल्याचं सांगत यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नसल्याचे म्हटले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणअयात आली होती. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या भेटीनंतर दिली होती. सध्या शरद पवार यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं असून ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.