नवी दिल्ली : भाजपा खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जी याला अटक करण्यात आली आहे. बेदरकारपणे गाडी चालवून ती धडकवल्या प्रकरणी आकाशला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. WB 02 W 3182 या क्रमांकाची कार अत्यंत भरधाव वेगात चालवून एका भिंतीला त्याने धडकवली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकाशला अटक केली आहे. तसेच अपघाताच्यावेळी आकाशने मद्यप्राशन केले होते की नाही याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
रुपा गांगुली यांच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून ती एका भिंतीला धडकवल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. आकाशला आज न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. आकाशचे कारवरचे नियंत्रण सुटले त्यानंतर ही कार एका भिंतीला जाऊन धडकली. रॉयल कोलकाता गोल्फ क्लबची ही भिंत होती. या घटनेत आकाशला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.