सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. जयसिद्धेश्वरशिवाचार्य यांनी सादर केलेले बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार करण्यात आली होती. महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी शनिवारी पूर्ण झाली. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले आहेत. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्या अर्जावर सुनावणी झाली असून आता अंतिम निर्णय तक्रादारांना पोस्टाने कळवण्यात येणार आहे.
जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळ कागदपत्रांबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे महास्वामींची खासदारकी धोक्यात आली आहे.
दरम्यान, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते “जायंट किलर’ ठरले होते.