राज्यात भाजपालाही बंडखोरीचे ग्रहण

पुणे – औरंगाबादेत काँग्रेसमध्ये पहिली बंडखोरी झाली असताना, आता युतीतही बंडखोरी सुरु झाली आहे. भाजपाने लोकसभा निवडणूकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह एकूण 6 खासदारांचा पत्ता कापण्यात आला. यामुळे भाजप पक्षातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र नाराज झाले असून ते अपक्ष निवडणूक लढवण्याची चर्चा आहे.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कन्या डॉ. भारती पवार यांनी हाती भाजपचा झेंडा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर डॉ. भारती पवार यांना दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवारीही देण्यात आली. त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज झाले आहेत. तसेच त्याचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून पक्षाशी प्रामाणिक असताना चव्हाण यांची उमेदवारी का नाकारली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे त्यांच्या पाठोपाठ शिर्डीतील शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढवत असल्याचं वाकचौरे यांनी म्हटलं. शिवसेना आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल जनतेची नाराजी असल्याने, मला ही निवडणूक लढवायची आहे, अशी भूमिका वाकचौरे यांनी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.