कोरोनावर शंख वाजवण्याचा आणि चिखलात खेळण्याचा सल्ला देणारे भाजप खासदार बाधित

जयपूर – अवघ्या जगाला सध्या कोरोना विषाणूने ग्रासले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सध्या साऱ्या जगाचा आटापिटा सुरु असून शास्त्रज्ञ दिवसरात्र एकत्र करून कोरोनावरील लस निर्मितीसाठी झटत आहेत. असं असलं तरी कोरोनाच्या या भयावह संकटातही देशातील काही नेत्यांची बेजबाबदार वक्तव्यं करून प्रसिद्धीच्या वलयात येण्याची सवय मोडलेली दिसत नाही.

याचंच एक उदाहरण म्हणजे राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप  खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया. खासदार जौनापुरिया यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी शंख वाजवण्याची व चिखलात खेळण्याचा सल्ला दिला होता. केवळ सल्ला देऊनच ते थांबले नव्हते तर त्यांनी ‘असं’ करतानाच स्वतःचा एक व्हिडिओदेखील पोस्ट केला होता. हा व्हिडीओ त्यावेळी प्रचंड व्हायरल देखील झाला होता.

मात्र कोरोनाला रोखण्यासाठी शंख आणि चिखल खेळाचा पर्याय सांगणारे खासदार महोदय आता स्वतःच कोरोनाच्या तावडीत सापडलेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला कोरोनाबाधित खासदार सोडता इतर सर्वांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. अशात खासदार जौनापुरिया यांनी देखील कोरोना चाचणी करून घेतली असता, त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे.

दरम्यान, यापूर्वी पापड खाल्ल्याने कोरोना होणार नाही असं सांगणाऱ्या एका केंद्रीय मंत्री महोदयांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. अशातच आता चिखलात खेळा व शंख वाजवा असं सांगणाऱ्या खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांनाही कोरोना बाधा झाली आहे.

यानिमित्ताने पापड खाणे, शंख वाजवणे व चिखलात खेळणे हे कोरोनाचे उपचार होऊ शकत नसल्याचे अधोरेखित झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेले सल्ले तंतोतंत पाळणे हाच सध्या कोरोनापासून बचाव करण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.