त्रिपुरातील भाजपाच्या सत्तेला हादरा ?

मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या नेतृत्वाला आव्हान

आगरतळा – त्रिपुरात सत्तेवर असणाऱ्या भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या दोन-तृतीयांश आमदारांनी नेतृत्वबदलाची मागणी करत मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा स्वीकारला आहे.

त्रिपुरात भाजपचे 36 आमदार आहेत. त्यातील 25 आमदार देव यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे समजते. त्यातील 12 आमदारांनी थेट दिल्लीला धाव घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन ते नेतृत्वबदलाची मागणी करणार आहेत.

देव यांच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आणि गैरकारभारामुळे भाजपचे नुकसान होत आहे. पक्ष जनतेपासून दुरावू लागला आहे. त्याचा फटका 2023 मधील विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असा इशारा असंतुष्ट आमदारांनी दिला आहे.

नेतृत्वबदलामुळे आणि मंत्रिमंडळ फेररचनेमुळे भाजपचे नुकसान टाळले जाऊ शकते, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटण्याची असंतुष्ट आमदारांची योजना आहे.

आता त्रिपुरातील आमदारांचे बंड थोपवण्याचे आव्हान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे आहे. त्या राज्यात नेतृत्वबदल होणार की आमदारांचे मन वळवण्यात भाजपला यश येणार हे पुढील काळात समोर येईलच.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.