काँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणं बंद करावं; महागाई कमी होईल,भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

रायपूर – ज्यांना महागाई ही राष्ट्रीय आपत्ती वाटते आहे, त्यांनी आपले जेवणच सोडावे, असे अजब विधान भाजपचे छत्तीसगडमधील आमदार ब्रिजमोहन आगरवाल यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजप आमदाराचे हे विधान लाजिरवाणे आहे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

भाजप नेत्यांची अशी विधाने पाहिल्यानंतर आता ते मोदींच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना देशही सोडून जायला सांगू शकतात. तो दिवस फार दूर नाही, असा टोमणाही कॉंग्रेसने मारला आहे.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना आमदार आगरवाल यांनी हे विधान केले होते. वाढत्या महागाईच्या संबंधात त्यांना प्रश्‍न विचारण्यात आल्यानंतर ते एकदम भडकले. ते म्हणाले की, ज्यांना महागाई ही आपत्ती वाटत आहे त्यांनी खाणे, पिणे सोडले पाहिजे. त्यांनी अन्न आणि पेट्रोल वापरणे सोडून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. कॉंग्रेसला मतदान करणारांनी हे करावे.

देशातील महागाई आपोआप कमी होईल, असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, आपण उपरोधाने हे विधान केले होते. त्यांच्या या विधानाच्या विरोधात तसेच केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात कॉंग्रेसने शनिवारी राज्यव्यापी निदर्शने आयोजित केली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.