आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चेला आले उधाण
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील मुखेड हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2015 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. तुषार राठोड हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले होते. आमदार तुषार राठोड यांनी कॉंग्रेसच्या हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचा पराभव केला होता.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे दि. 1 व 2 ऑगस्ट 2019 रोजी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. यानिमित्त 2 ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्ह्यातील विधानसभेचे एकमेव आमदार डॉ. तुषार राठोड यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तिथे माजी पालकमंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, देगलूर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे हेदेखील उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विधानपरिषद सदस्य तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर ही मंडळीदेखील नांदेड शहरात राहतात. परंतु यापैकी कोणीही आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला गेले नाही. एकटे आमदार राठोड आदित्य ठाकरेंना भेटायला गेले होते.
एरवी कोणत्याही स्वपक्षाचे तसेच इतर पक्षाच्या नेत्याच्या भेटीपासून, सभेपासून दूर असणाऱ्या तुषार राठोड यांनी अचानक आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. सध्या सुरु असलेले मुखेड मतदार संघातील नाराजीनाट्य, उमेदवार बदलाचे वारे आणि मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या नावाची चर्चा पाहून तुषार राठोड सेनेच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा जोर धरत आहे.