उल्हासनगरात भाजपच्या महापौरांकडून राष्ट्रवादीचा प्रचार

कल्याण – उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेल्या सासूचा भाजपच्या महापौर असलेल्या सुनबाई खुलेआम प्रचार करताना दिसत आहे. यामुळे भाजपमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

उल्हासनगरात ज्योती कलानी या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या सुनबाई पंचम कलानी या भाजपच्या नगरसेविका असून उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान महापौर आहेत. मात्र सासूबाईच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पंचम कलानी या भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीचा खुलेआम प्रचार करत आहेत. यामुळे भाजपच्या गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.

पंचम यांनी राष्ट्रवादीचा प्रचार थांबवला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. याबाबत पंचम कलानी यांना नोटीस पाठवल्याचेही भाजपने सांगितले.

मात्र, पंचम यांनी आपल्याला अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच अशी नोटीस आलीच, तर ती फाडून भाजप नेत्यांच्या तोंडावर मारु, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीतून कलानी विरुद्ध भाजपमधून आयलानी अशी लढत होणार असून याच वादातून हे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.