करोनाच्या लसीवर भाजपचा अधिकार नाही

पक्षाच्या आश्‍वासनावरून गदारोळ

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यात अनेक गोष्टींची आश्‍वासने देण्यात आली आहेत. मात्र एका आश्‍वासनामुळे पक्ष आणि हा जाहीरनामा अडचणीत सापडला आहे.

बिहारच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने करोनाची मोफत लस देण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र त्यावरूनच आता राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसनेही भाजपला लक्ष्य केले आहे.
करोनावर जी लस येणार आहे, ती पूर्ण देशाची आहे. भारतीय जनता पार्टीची नाही अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी तोफ डागली आहे. तसेच भाजपकडे राज्यात चेहराच राहीला नसल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांना बिहारमध्ये येउन व्हिजन डॉक्‍युमेंट प्रकाशित करावे लागले अशी टीकाही त्यांनी केली.

इतर आश्‍वासने देण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी बिहारला विशेष आर्थिक पॅकेज आणि विशेष राज्याचा दर्जा का दिले नाही, ते सर्वप्रथम जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही भाजपला लक्ष्य केले आहे. करोनाच्या मोफत लसीचे आश्‍वासन देउन भाजप बिहारच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. करोनाची लस हा चेष्टेचा अथवा खोटे बोलण्याचा विषय नाही असेही त्यांनी बजावले आहे.

दरम्यान, बिहारच्या लोकांना मोफत लस देण्याचे भाजपने म्हटले आहे. उत्तर प्रदेश अथवा अन्य राज्यांकरता त्यांनी अशी घोषणा का केली नाही, असा सवाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्‌वीट करून विचारला आहे. भाजपच्या अशा संधीसाधू आणि संकुचित राजकारणाचा मतदार निवाडा करतील असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.