नगर – भाजपच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख प्रा. राम शिंदे यांनी केली. त्यात लोकसभा संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी ऍड.अभय आगरकर, प्रचारप्रमुखपदी नामदेव राऊत, आचारसंहिता प्रमुखपदी (कायदेशीर) ऍड.युवराज पोटे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील व्यवस्थापन समितीची रचना करण्याची सूचना करण्यात आली होती. निवडणूक कार्यकाळात विविध समितीच्या प्रमुखपदी निवड करुन त्यांना मागणीनुसार सहाय्यक देण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीला अनन्य साधारण महत्व असून, नियमितपणे ही समिती प्रदेश भाजपच्या संपर्कात राहत असून, या लोकसभा कार्यक्षेत्रातील प्रचार सभा व इतर नियोजनासाठी आढावा घेतला जात असतो. लोकसभा समितीच्या इतर समित्यांमध्ये प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडिया प्रमुखपदी निशांत दातीर, कार्यालय प्रमुखपदी भैय्या गंधे, दौरा प्रमुखपदी श्याम पिंपळे, सह दौराप्रमुखपदी सुभाष दुधाडे, जाहीर सभा प्रमुखपदी बापूसाहेब बाचकर, सह प्रमुखपदी रोहन मांडे, तसेच युती समन्वयकपदी सचिन पारखी यांची निवड करण्यात आली आहे.