अग्रलेख : ‘सुशासनबाबू’ प्रतिमेला तडा!

माजी केंद्रीय पोलादमंत्री आर. पी. सिंह यांना राज्यसभा उमेदवारी न देण्याचा निर्णय जनता दल युनायटेड (जेडीयू)ने घेतल्यामुळे खळबळ माजली होती. रा. स्व. संघाच्या अनेक नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांना राज्यसभेत प्रवेश मिळावा ही भाजपची इच्छा होती, तरीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना न दुखावण्याची भूमिका भाजपने घेतली.
बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांचे संयुक्त सरकार असून, भाजपपासून फारकत घेऊन नितीशकुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल (राजद) सोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा मे महिन्यात सुरू होती. राजदच्या इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी ते आपल्या निवासस्थानातून चालत राजद नेत्या व लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर जेडीयूने दिलेल्या इफ्तार पार्टीत राजदचे प्रमुख आणि लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव हे उपस्थित होते. बिहारमधील जातगणनेच्या मुद्द्यावर नितीशकुमार आणि तेजस्वी यांची समान भूमिका आहे. जेडीयू आणि भाजप यांच्या संबंधात लक्षणीय परिवर्तन आले आहे, असे दिसते.
2005 साली नितीशकुमार बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून निवडले गेले. जेडीयू-भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानसभा सत्राच्या अगोदर झालेली नाही, असे 17 वर्षांत यंदा प्रथमच घडले आहे. अशा बैठकीनंतर दोन्ही पक्षांचे आमदार आपापले प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडतात आणि विधानसभा सत्रात कोणती भूमिका घ्यायची, याची चर्चा करतात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशी बैठक बोलावली, परंतु त्यास फक्त जेडीयूचेच आमदार हजर होते. यावेळी विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभाध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांनी अचानकपणे एक ठराव मांडला. ठरावावर आवाजी मतदान घेण्याऐवजी, आश्चर्यकारकपणे त्यांनी सदस्यांना उभे राहण्यास सांगितले.
वास्तविक जेव्हा डिव्हिजन ऑफ व्होट्स म्हणजे मतविभागणी असते, तेव्हाच हा पर्याय अवलंबला जातो. सिन्हा हे भाजपचे असून, 2010 पासून ते आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे नितीशकुमार हे अत्यंत संतप्त झाले होते. कारण ज्या ठरावावर ते मतदान घेत होते, तो सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचाच प्रकार होता. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सिन्हा यांनी, सर्वोत्कृष्ट विधानसभा सदस्य कोण, यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. हा विषय एखादी समिती स्थापन करून हाताळता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असूनही सभाध्यक्षांनी आपले म्हणणे पुढे रेटले. त्यानंतर, विधानसभा सत्रावर बहिष्कार घाला किंवा अधिवेशनास हजर राहू नका, असा निरोप सर्व जेडीयू आमदारांना गेला.
सत्तारूढ पक्षानेच अधिवेशनास अनुपस्थित राहण्याची ही बिहारमधील पहिलीच घटना. आपल्या पक्षाचे आमदार कुठे दिसत नाहीत, हे जेडीयूच्या दोन मंत्र्यांच्या उशिरा लक्षात आले आणि मग त्यांनीही विधानसभेतून पोबारा केला. विधानसभेत निम्मे सदस्य गैरहजर असल्याचे लक्षात येताच सिन्हा यांनी अर्ध्या तासाने चर्चा थांबवली. गेले काही महिने असे घडत आहे की, बिहारमधील सत्तारूढ आघाडीत काही बिघाडी झाली की लगेच भाजपचे राष्ट्रीय नेते हस्तक्षेप करतात आणि मुख्यमंत्र्यांना शांत करतात. तसेच भाजपचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करतात. केंद्रीय मंत्री
धर्मेंद्र प्रधान हे भाजपचे बिहारसाठी खास दूत आहेत. त्यांनी लगेच एक ऍनी मार्ग, या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि यापुढेही नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे ठामपणे सांगितले. भाजपच्या बिहारमधील नेत्यांनी तूर्तास संघर्षाची भूमिका घेऊ नये, असे संकेतच प्रधान यांनी दिले आहेत. परंतु तरीही भाजप आणि जेडीयूचे संबंध विकोपाला गेले आहेत, हे स्पष्ट आहे. नितीशकुमार हे अकार्यक्षम आहेत, अशी टीका प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून वारंवार होत आहे. यावेळी बिहारमध्ये जेडीयूपेक्षा भाजपची ताकद पुष्कळच जास्त आहे. तरीदेखील भाजपने नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री बनवले. ते आपल्या टाचेखाली राहतील, अशी भाजपची अपेक्षा होती.
सुशील मोदी आणि नंदकिशोर यादव या भाजपच्या नेत्यांशी नितीशकुमार यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु आता ते राज्यस्तरावर पूर्वीसारखे सक्रिय नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याजवळ सध्या नित्यानंद राय आणि संजय जयस्वाल हे नेते आहेत आणि त्या नेत्यांशी नितीशकुमार यांचे संबंध खास नाहीत. आज बिहारमध्ये राजद हा प्रमुख विरोधी पक्ष असला, तरी भाजपमधूनच नितीशकुमार यांच्यावर अधिक टीका होत आहे. नरेंद्र मोदी सरकारने “अग्निपथ’ ही योजना आणताच, या योजनेचा फेरविचार करावा, अशी मागणी जेडीयूने केली. “अग्निपथ’ विरोधी आंदोलनात बिहारमधील रेल्वेच्या मालमत्तेची तीनशे कोटी रुपयांची हानी झाली. उपमुख्यंमत्री रेणूदेवी यांच्या घरावर हल्ला झाला. परंतु मुख्यमंत्र्यांनी याचा निषेध केला नाही वा शांततेचे आवाहनही केले नाही.
बिहार पोलिसांच्या समक्ष भाजपची कार्यालयेही जाळण्यात आली. तेव्हा केंद्र सरकारने निमलष्करी फौजा पाठवल्या. नितीशकुमार हे सुशासनबाबू राहिले आहेत का, असा प्रश्न भाजपचे नेते विचारू लागले. बिहारमधील दारूबंदी फसली आणि दारूवाले, गुंड व पोलिसांची अभद्र युती तयार झाल्याचे पाहायला मिळाले. जेडीयू-भाजप सरकारमध्ये प्रत्येक खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे पेपर फुटले आणि प्रमुख आरोपी शंभूकुमार हा जेडीयूचा सदस्य असल्याचे उघड झाले.
एका लाचखोर अधिकाऱ्याला काही वर्षांपूर्वी अटक झाली होती. त्याला पुन्हा नोकरीत घेण्यात आले आणि तेदखील त्याला हव्या असलेल्या पदावर. भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही, असे म्हणणाऱ्या नितीशकुमार यांच्या राजवटीत हे घडत आहे. नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेत घसरण होत असून, ठाकरे सरकार हे महावसुली सरकार आहे, असे म्हणणाऱ्या भाजपला बिहारमध्ये तोंड लपवून फिरावे लागत आहे. कारण तेथील भ्रष्ट व अकार्यक्षम सरकारमध्ये भाजपही सहभागी आहे.





