मुंबई : मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या बँकेचा महाव्यवस्थापक व लेखा प्रमुख हितेश मेहता याने 122 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले होते. या घोटाळा प्रकरणात भाजप नेत्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. जावेद आझम असं भाजप नेत्याच्या भावाचे नाव आहे. जावेद आझम भाजपचे माजी महाराष्ट्र सचिव हैदर आझम यांचा भाऊ आहे. या घोटाळा प्रकरणातील ही सातवी अटक असून भाजप नेत्याचा भाऊ जावेद आझमला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
या घोटाळा प्रकरणात सहावा आरोपी अुणाचलम उल्हानाथन मरूथुवर हा रविवारी मुंबई पोलिस आयुक्तालयात शरण आला. उल्हानाथन अरुणाचलमच्या चौकशीत जावेद आझमचे नाव समोर आल्याने त्याला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बाजवले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली. या घोटाळ्यातील रक्कमेतील १८ कोटी रुपये जावेदला दिल्याचा अरुणाचलमने दावा केला आहे.
दरम्यान, मुंबईतील न्यू इंडिया बँक लुटली गेली असून त्यामागे सर्व भाजपचे लोक आहेत. जनतेचा पैसा लुटणारे सगळे बिल्डर मग ते मेहता, जैन आणि भाजपचा एक कदम अशी सगळी भाजपची माणसे आहेत. आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? शेकडो कोटींना बँक लुटली गेली. आता का बोलत नाहीत? भाजपाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही?, असा सवाल राऊत यांनी केला होता.
जॉर्ज फर्नांडिस यांनी ही बँक स्थापन केली होती. बँकेतून लुटला गेलेला पैसा हा गरीबांचा, सामान्य माणसांचा नाही का? आता तुमच्याकडे कागदपत्र, पुरावे नाहीत का? आता ईडीकडे का नाही जात? आता तुम्ही पत्रकार परिषद होत नाहीत? भाजपचे आमदार यामध्ये अडकले आहेत. त्यांच्या दबावाखाली कर्जवाटप झाले, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता. तसेच, ज्या बिल्डरांना पैसे मिळाले ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित असल्याचेही ते म्हणाले होते.
१२ फेब्रुवारी २०२५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका पथकाने को-ऑपरेटिव्ह बँकेचे लेखापरीक्षण केले. यावेळी अधिकाऱ्यांना बँकेच्या रोख रकमेच्या नोंदीमध्ये शेकडो कोटी रुपयांची तफावत आढळून आली. विशेष बाब म्हणजे, मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या शाखेच्या तिजोरीतून तब्बल १२२ कोटी रुपये गायब होते. याशिवाय गोरेगाव येथील को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तिजोरीतही १० कोटी रुपयांची तफावत आढळली. चौकशीअंती, बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना ताब्यात घेण्यात आले. ते २०१९ ते २०२५ या सहा वर्षांत बँकेचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते. त्यानंतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.