मुंबई – विधानसभा निवडणुकीत आमचं ठरलय म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदावरून बिनसले. यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली आहे. परंतु, शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तळ्यात-मळ्यात असणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंब्याचे पत्र न दिल्याने राज्यपालांनी दिलेल्या 24 तासांच्या मुदतीत शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याने मातोश्रीचीही कोंडी झाली. या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या भेटीसाठी भाजप नेत्यांनीही रुग्णालयात हजेरी लावली आहे.
भाजप नेते आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील यांनी संजय राऊत यांची रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले कि, वैचारिक मतभेद असो वा, नसो, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो, त्यामागे कोणतीही राजकीय घडामोड नाही. त्यांना कमी बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे आमचीही तीच इच्छा आहे. भाजप पदाधिकारी प्रताप आशरही अॅडमिट असल्यामुळे त्यांचीही भेट घेतली, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली ! pic.twitter.com/mBV1p3R830
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 12, 2019
दरम्यान, संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आहेत. त्यामुळे अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.