नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप असणारे भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांची गुरुवारी रात्री पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी सार्वजनिकपणे आरोप करत ब्लॅकमेल तसेच वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांकडून ही चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांची जवळपास सात तास चौकशी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास समितीकडून ही चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांच्या नावे अनेक आश्रम आणि शैक्षणिक संस्था आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजता पोलिसांनी सुरु केलली चौकशी रात्री 1 वाजेपर्यंत सुरु होती. यावेळी त्यांनी मुलीकडून करण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारण्यात आले. मुलीने आपल्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले, तसेच त्या व्हिडीओची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याचे आरोपात म्हटले आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्या वकिलांनी आपण पोलिसांनी तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे.