नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली होती. आता निवडणूक झाल्यानंतर (Subramanian Swamy on PM Modi)भारतीय जनता पार्टीचेच नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. रावणाप्रमाणे धार्मिक असल्याचा दावा करत मोदी एकतर मंदिरे तोडत आहेत किंवा त्यांच्यावर कब्जा करत आहेत असा दावा स्वामी यांनी केला आहे.
आज म्हणजे शनिवारी स्वामी यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात की, मोदी धार्मिक असल्याचा दावा करत मंदिरे ताब्यात घेत आहेत किंवा तोडत आहेत. त्यांनी वाराणसी आणि उत्तराखंडनमध्ये तसेच केले. आता महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते पंढरपूर येथील पवित्र स्थळे नष्ट करण्याची योजना बनवत असल्याचे आम्हाला दिसते आहे. हा संहार रोखण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहे.
Modi like Ravan while claiming to be religious is demolishing or grabbing temples as in Varanasi, in Uttarakhand, and now we find he is planning with Fadnavis to destruct the holy sites of Pandharpur. Hence I am approaching High Court in Mumbai soon to stop this carnage.
— Subramanian Swamy (@Swamy39) December 10, 2022
पंढरपूर कॉरिडॉर योजनेसाठी अहिल्याबाई होळकर आणि बैजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण मंदिरे तोडली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यसभा सदस्य असलेले सुब्रमण्यम स्वामी नाराज असून त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
एका संकेतस्थळावर स्वामी यांचे याबाबतच्या ट्वीट टाकण्यात आले असून ही बातमी त्यानुसार देण्यात आली आहे. मात्र त्यात पंढरपूरचा उल्लेख असला तरी कोणती मंदिरे आहेत त्याचा उल्लेख नाही.