सहारनपूर – उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते योगेश रोहिल्ला याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात त्याचा मुलगा आणि ११ वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश रोहिल्ला हा भाजपचा कार्यकारी सदस्य असून, घटनास्थळी त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली पिस्तूलही जप्त करण्यात आली आहे. सहारनपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) रोहित सजवान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. SSP सजवान यांनी सांगितले की, योगेशला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यामुळे त्याने हे हिंसक पाऊल उचलले.
“योगेश रोहिल्लाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर आणि तीन मुलांवर गोळीबार केला. दोन मुले जागीच ठार झाली, तर पत्नी आणि तिसरे मूल गंभीर अवस्थेत सहारनपूर जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत,” असे सजवान म्हणाले.
मानसिक तणावात होता आरोपी –
सूत्रांनुसार, योगेश गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता, परंतु त्याने याबाबत शेजाऱ्यांशी किंवा कोणाशीही चर्चा केली नव्हती. ही भयंकर घटना संगाठेडा गावात घडली, ज्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर तपास सुरू केला आहे.
स्वतःहून पोलिसांना कळवले –
असे सांगण्यात येते की, गुन्हा घडल्यानंतर योगेशने स्वतः पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, घटनाक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपीची चौकशी सुरू असून, या कृत्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.
परिसरात खळबळ –
या घटनेने संपूर्ण परिसरात हादरे बसले आहेत. दोन मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून, तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.