जयपूर : राजस्थानमधील सत्ता संघर्षाचा गोंधळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यात काँग्रेसकडून ऑडिओ टेपचा मुद्दा समोर आल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयपूर पोलिसांनी संजय जैन यांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेसने या ऑडिओ टेपमध्ये थेट केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे नाव घेतले आहे. जयपूरमध्येही शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाचे बंडखोर आमदार भंवरलाल आणि विश्वेंद्र सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपात त्यांनी, “काही ऑडिओ टेप समोर आल्या आहेत, ज्यात भंवरलाल, संजय जैन आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज आहे. “पैशांची चर्चा झाली आहे,” असं भंवरलाल शर्मा बोलत आहेत. तर “साहेबांना सांगितलं आहे,” असं संजय जैन बोलत आहेत.या टेपमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, भाजप लोकशाहीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरजेवाला म्हणाले की, ‘केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात एसओजीमार्फत गुन्हा दाखल करा आणि तपासात दोषी आढळले तर अटक करा, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली होती.
दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भंवर लाल शर्मा यांनी ही ऑडिओ टेप बनावट असल्याचा दावा केला आहे. या पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या पक्षाच्या दोन आमदारांनाही पक्षातून निलंबित केल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, “भवंरलाल आणि विश्वेंद्र सिंह यांना पक्षातून निलंबित केलं असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.” तसंच पक्षाने सचिन पायलट यांनीही समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल्यांच सुरजेवाला म्हणाले. विश्वेंद्र सिंह गहलोत सरकारमध्ये मंत्री होते.