कोल्हापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे बडे नेते समरजितसिंह घाटगे यांनी आज अधिकृतरित्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. समरजितसिंह घाटगे तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर आज त्यांनी शरद पवार गटात अधिकृतरित्या प्रवेश केला.
कागलमधील ऐतिहासिक गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. समरजितसिंह घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर समरजित सिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजित घाटगेंची उमेदवारी दिली जाऊ शकते.
समरजितसिंह घाटगे कोण आहेत ?
समरजितसिंह घाटगे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे (घाटगे) वंशज आहेत. त्यांनी पुण्यातून चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण घेतले.वडिलांच्या निधनानंतर छत्रपती शाहू कारखानाच्या निवडणुकीत समरजीत घाटगेंचा विक्रमी मतांनी विजय झाला. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय झाले. 2015 मध्ये समरजितसिंह घाटगेंकडे पहिल्यांदाच अध्यक्षपद सोपवण्यात आलं. म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपमध्ये असताना घाटगेंकडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. समरजितसिंग घाटगे हे अगदी परवापर्यंत भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 3 सप्टेंबर म्हणजे आज समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.