लखनौ -उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीचा अखेरचा टप्पा सुरू झाला असताना भाजपला एक जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयंक जोशी यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आझमगडमधील प्रचार सभेमध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे.
मयंक जोशी यांच्यासाठी रिटा बहुगुणा जोशी यांनी भाजपकडे विधानसभेच्या निवडणूकीसाठी तिकीट मागितले होते. लखनौ कॅन्टोन्मेंटच्या जागेवरून आपल्या मुलाला विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा त्यांचा मानस होता. हे तिकीट मिळाले नाही, तर आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊ अशी तयारी जोशी यांनी दर्शवली होती. अपेक्षेप्रमाणे मयंक जोशी यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र त्यानंतर रिटा बहुगुणा जोशी यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका मागे घेतली आणि आपण पक्षाच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले होते.