अश्लील व्हिडीओ व्हायरल होताच भाजप नेत्याचा मंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली – महाराष्ट्रात महाविका आघाडीतील नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा देण्याचे प्रकरण शांत झाले नाही, तोच कर्नाटकमधील भाजप नेते आणि जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर एका युवतीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजानीमा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे मंत्री जारकीहोळी यांचा युवतीसोबतचा अश्लील व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देत असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे. युवतीला सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी केला होता. शिवाय रमेश जारकीहोळी यांचे काही अश्लील व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.

पीडित 25 वर्षीय युवतीचे रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वारंवार लैंगिक शोषण केलं. मात्र नोकरी देणार नाही हे समजल्यानंतर युवतीने दोघांचे खासगी क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. तोच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

या प्रकरणानंतर रमेश जारकीहोळी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे पाठवून दिला आहे. “माझ्यावरील आरोपात कोणतंही तथ्य नाही. पण नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी. माझा राजीनामा स्वीकारावा,” असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात नमूद केलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.