नवी दिल्ली : कोलकात्यामध्ये नुकतीच पोलिसांकडून चांगलीच धरपकड झाल्याचे पाहायला मिळाले. ही धरपकड कोणत्या गुन्हेगाराची नसून तर चक्क एका भाजप नेत्याची होती. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या पत्नीसोबत कथित गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी भाजपाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक भाजपा नेत्याने या महिलेला छेडले असता तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घेत तात्काळ भाजपा नेत्याला अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री जेव्हा महिला औषध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा नेता आणि त्याच्यासोबतच्या काही लोकांनी तिच्यासोबत गैरवर्तवणूक केली होती. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी भाजपा नेत्याच्या घरात घुसून त्याला अटक केली. या भाजपा नेत्यावर संबंधित महिलेशी छेडछाड आणि एका स्थानिक क्लबमध्ये तोडफोड केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
भाजपा नेते सजल घोष यांनी दावा केला की, मला कुठल्याही गुन्ह्याविना पोलिसांनी अटक केली आहे. सजलच्या वडिलांनीही सजलवरील आरोप खोटे असून त्याला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले. तर पोलिसांच्या या कारवाईविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मोचीपारा ठाण्याचे पोलीस दुपारी सजल घोषच्या अटकेसाठी त्यांच्या घरी पोहचली आणि चहुबाजूने घराला वेढा दिला. त्यानंतर पोलिसांनी घोष यांना घराबाहेर येण्यास सांगितले. परंतु ते बाहेर आले नाहीत. त्यानंतर दरवाजा तोडून पोलीस आतमध्ये घुसले आणि सजल घोषला अटक करण्यात आली. सजल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तोडफोड आणि छेडछाडीचा दोन विविध आरोप लावण्यात आले आहेत. परंतु सजल आणि भाजपाकडून दोन्ही आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.