बीड : दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला लोकांची तुफान गर्दी झाली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी शेरो शायरीने आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान महाराष्ट्र दौऱ्याची घोषणादेखील केली.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही, पण लोक आपसूक येतात. या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आलेत. नाशिकहून, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले आहेत. गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोला अमरावती पुणे पिंपरी चिंचवड कुठून कुठून लोक आले आहेत आज सभेला. सगळ्या राज्यभरातून बांधव आलेत.
मी दरवर्षी तुम्हाला साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं, मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली.