नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. आता इस्लामिक स्टेट ऑफ खुरासानने त्यांना धमकावले आहे. त्यांच्या व्हॉइस ऑफ खुरासान या न्यूज लेटरमध्ये नरेंद्र मोदी सरकार आणि सरकारमधील इतर नेत्यांच्या विधानांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अनेक देवी देवतांची पुजा करणाऱ्या भारतीय राजांनी महमूद गझनवीचा सामना करण्यासाठी आता सज्ज व्हावे अशी धमकी न्यूज लेटरच्या २५ व्या पानावर देण्यात आली आहे.
दरम्यान, नुपूर शर्मा यांना धमकावण्याच्या आरोपाखाली गेल्या काही दिवसांत अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात गुजरातच्या सूरत येथील पोलिसांनी बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका तरुणाला अटक केली होती. त्यानेही शर्मा यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. शहनाझ उर्फ अलि असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानातील एका संघटनेशी संबंधित होता. त्यानंतर सूरत पोलिसांनीच मौलवी सोहेल अबूबक्र तिमोल यालाही अटक केली आहे. पाकिस्तान आणि नेपाळमधील काही जणांच्या मदतीने शस्त्रे खरेदीचा कट रचताना तो आढळून आला होता.
दरम्यान, वादग्रस्त विधान केल्याबद्दल नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विधानामुळे केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वादंग निर्माण झाले होते. आखाती देशांनी त्या विधानांना तिव्र आक्षेप घेतला होता. कतार, कुवेत आणि इराण या देशांत भारतीय राजदुतांना पाचारण करण्यात आले होते. स्वत: नुपूर यांना अनेक वेळा ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून त्यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक जणांना अटकही करण्यात आली आहे.