भाजप नेत्याची अनंतनागमध्ये हत्या

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष गुल मुहम्मद मीर यांची काल (शनिवारी) दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम वेरिनाग भागात मीर यांच्या घरात तीन दहशतवादी घुसले आणि त्यांनी कारच्या किल्ल्यांची मागणी केली. कारमधून पळून जात असतानाच दहशतवाद्यांनी मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. मीर यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

जम्मू काश्‍मीरमधील भाजपच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये मीर यांच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्‍त करण्यात आले आहे. तसेच मारेकऱ्यांना पकडून योग्य शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनीही या हत्येचा निषेध केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.