मुंबई – महाराष्ट्रातील नागपूरमध्ये होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाखो तरूणांना रोजगार देणारा हजारो कोटींचा वेदांता -फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता तब्बल 22 हजार कोटींचा हा एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. गुजरातमध्ये 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
दरम्यान, यावर महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हा प्रकल्प गुजरातला जाण्याबाबत महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. उपाध्ये म्हणाले, सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यावर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे.
मात्र काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला होणार असल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते.
काय आहे प्रकल्प ?
सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने सप्टेंबर 2021 मध्ये स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. संरक्षण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2021 रोजी करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर नवी दिल्लीत 27 ऑक्टोबर 2022 रोजी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की, कराराअंतर्गत 16 विमाने उड्डाणासाठी सज्ज अशा स्थितीत वितरित केली जातील आणि 40 विमाने भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टीएएसएलच्या नेतृत्वाखाली भारतात तयार करेल. लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो.
दरम्यान, ‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरामध्ये भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
वेदांता-फाॅक्सकाॅन नंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. अगोदरच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार केंद्राला समर्पित असल्याची टीका विरोधक सातत्याने करत असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर आता एकामागून एक मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला जात आहे. वेदांता नंतर आता लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातला गेल्याने लाखो तरूण या प्रकल्पामुळे मिळणाऱ्या रोजगारापासून वंचित राहणार आहेत.