नवी दिल्ली : भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना करोनाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले होते. पण आता त्यांनी करोनावर यशस्वीरीत्या मात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते घरी परतले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याबाबत माहिती दिली.
ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांना ९ जून रोजी करोनाची लागण झाल्यचे स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी करोनावर मात केल्याचे समोर आले असले तरी अद्याप त्यांच्या आईची प्रकृती सुधारलेली नाही तसेच त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती देताना, “देशाचे आणि राज्याचे लोकप्रिय नेता ज्योतिरादित्य शिंदे पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यांच्या आईच्या प्रकृतीतही लवकर सुधारणा होवो हिच देवाकडे हात जोडून प्रार्थना”, अशा आशयाचे ट्विट शिवराज यांनी केले आहे.
देश और प्रदेश के लोकप्रिय नेता, हमारे अनुज श्री @JM_Scindia जी पूरी तरह स्वस्थ हो कर घर लौटे है, ये अत्यंत आनंद और प्रसन्नता का विषय है।
उनकी माताजी, श्रीमंत राजमाता ग्वालियर के स्वास्थ्य में शीघ्र सुधार हो ऐसी ईश्वर से करबद्ध प्रार्थना।
🙏🏽
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) June 16, 2020
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये बाजूला टाकलं गेल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशमध्ये लवकरच राज्यसभेच्या निवडणुका लागणार आहे. यात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.