संसदीय पक्षाच्या नव्या कार्यकारी समितीची स्थापना
स्मृती इराणी यांचे महत्व वाढले
नवी दिल्ली – केंद्रातील सत्तारूढ आघाडीचे (एनडीए) नेतृत्व करणाऱ्या भाजपने बुधवारी आपल्या संसदीय पक्षाच्या नव्या कार्यकारी समितीची घोषणा केली. त्यानुसार, पक्षाच्या लोकसभेतील नेतेपदाची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवण्यात आली. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लोकसभेतील उपनेतेपद देण्यात आले.
राज्यसभेचे नेतेपद थावरचंद गेहलोत आणि उपनेतेपद पियूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आले. राज्यसभेतील नेतेपदाची जबाबदारी याआधी माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्याकडे होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव करणाऱ्या स्मृती यांचे भाजपमधील महत्व वाढल्याचे मानले जात आहे. भाजपच्या मुख्य प्रतोदपदी (चिफ व्हिप) संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभेतील 18 खासदारांना प्रतोद करण्यात आले आहे. त्यात प्रथमच 3 महिला खासदारांचा समावेश आहे.
समितीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून लोकसभेतील नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, अर्जुन मुंडा, नरेंद्रसिंह तोमर आणि जुअल ओराम या सदस्यांना स्थान मिळाले आहे. तर राज्यसभेतील जे.पी.नड्डा, ओमप्रकाश माथूर, निर्मला सीतारामन्, धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर या सदस्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपच्या संसदीय कार्यालयाचा प्रभार कैलाश विजयवर्गीय यांच्याकडेच पुन्हा सोपवण्यात आला आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये बहुधा प्रथमच लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश नाही. जेटली आणि सुषमा स्वराज हेही समितीचे सदस्य नाहीत. त्यामुळे भाजपच्या सर्वोच्च स्तरावरील नेतृत्व बदलाचे प्रतिबिंब समितीमध्येही उमटले आहे.